Jump to content

चंद्रग्रहण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२१ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी दिसलेल्या चंद्रग्रहणाच्या वेळेस ग्रस्त चंद्रबिंबाचे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून टिपलेले प्रकाशचित्र
चंद्रग्रहण
चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र नारंगी दिसण्याचे प्रकाश परिवर्तन

जेव्हा पृथ्वी ही सूर्यचंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९'चा कोन आहे. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवत नाही.

वर्षातील अनेक पौर्णिमांपैकी एखाद-दुसऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असू शकते. चंद्र ग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. कोणतेही ग्रहण हे छायाकल्प, खंडग्रास किंवा खग्रास असते. जगात जेथे जेथे आकाशात चंद्र असेल तेथे तेथे ते एकाच वेळी दिसते.

इसवी सन १९०१, १९०५; १९०८,१९१२; १९१९, १९२३, १९२६, १९३०; १९३७, १९४१; १९४८, १९५२; १९५५, १९५९; १९६६, १९७०; १९७३, १९७७; १९८४, १९८८; १९९५, १९९९ ह्या विसाव्या शतकातील २२ वर्षी चंद्रग्रहणे नव्हती. यावरून असा निष्कर्ष निघतो की चंद्रग्रहण नसण्याचे खंड म्हणजे इसवी सनाचे तीन-चार वर्षांचे कालांतर असते. मात्र, दर चतुर्वर्षीय कालांतरानंतर तीन किंवा सात (क्वचित १०) वर्षांचा खंड पडतो.

याच नियमाने २१व्या शतकात २००२ ते २००६; २०१६ ते २०; २०२७ ते ३१ .......या कालखंडांत चंद्रग्रहणे नसतील.

२०व्या शतकापासून ते ३०व्या शतकापर्यंतच्या काळात १२,०६४ चंद्रग्रहणे होती/असतील

सूर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली ही प्रछाया (गडद छाया) व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया ही सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सूर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सूर्यकिरण सूर्याच्या एका भागातून येतात.

  • चंद्र परिभ्रमण करत प्रथम उपछायेत येतो. त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात.
  • त्यानंतर चंद्र प्रछायेत (दाट छायेत) येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो. तेव्हा चंद्रग्रहण लागले असे म्हणतात.
  • कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो. तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात. त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी असतो.
  • काही वेळाने जेव्हा चंद्र उपछायेतून बाहेर पडतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशमान होतो.

खग्रास चंद्रग्रहण

[संपादन]

जेव्हा चंद्र (पृथ्वीवरून पाहिले असता) पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळ खग्रास चंद्रग्रहण होते. खग्रास ग्रहणात पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये शिरल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाही. परिणामी चंद्र पूर्णपणे काळा दिसला पाहिजे, असे वाटणे साहजिकच आहे. मात्र असे घडत नाही. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधून प्रकाशकिरण अपवर्तित होऊन चंद्रावर पडतात. त्यातही लाल रंगाच्या प्रकाशकिरणाचे सर्वात जास्त अपवर्तन होत असल्याने अनेक ग्रहणांच्या वेळी चंद्र तांबूस दिसतो.

खंडग्रास चंद्रग्रहण

[संपादन]

जेव्हा चंद्राचा काही भाग (पृथ्वीवरून पाहिले असता) पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण होते.

इतिहास

[संपादन]

आर्यभट्ट (पहिला), वराहमिहीर आदी विद्वानांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. ११ ऑगस्ट इ.स. ५१९ चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टाला काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. १८ वर्षे व १० दिवसांनी होणाऱ्या ग्रहणांची एक मालिका प्रदीर्घ काळ चालू राहते. या चक्रास खगोलशास्त्रज्ञ आज सॅरॉस चक्र म्हणतात.

ज्योतिष

[संपादन]

चंद्रग्रहण विविध तत्त्वांच्या राशीतून, (जसे जलतत्त्वाच्या, अग्नितत्त्वाच्या वगैरे) निरनिराळी फले देते असे भारतीय ज्योतिष मानते.

बाह्य दुवे

[संपादन]
  • [लोकसत्ता संकेतस्थळ - चंद्रग्रहणाच्या निमित्ताने... मराठी] (मराठी मजकूर)
  翻译: